पंढरपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक शब्दात पुन्हा एकदा टीका केली आहे. यावेळी त्यांनी लहानपणीची आठवण सांगून मोदींना टोला लगावला आहे. लहानपणी आई आम्हाला सांगायची की घरात भांडी वाजवली तर दारिदय्र येते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशालाच ताट वाजवायला लावली, अशी टीका त्यांनी केली आहे.
तसेच चीनमधील कोरोना भारतात कसा आला याची चर्चा झाली पाहिजे. २०१९ मध्ये आपल्या प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला, असा दावा यावेळी नाना पटोले यांनी केला. ते गुरुवारी राष्ट्रवादीचे उमेदवार भरत भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपुरात सभेत बोलत होते.
मोदी महाराजांनी जनता कर्फ्युच्या नावाखाली थाळ्या वाजवायला सांगितल्या. त्यानंतर दिवे लावण्याचा उद्योग केला. या काळात मुस्लिम समाजामुळे कोरोना पसरतो, असं सांगून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आतादेखील देशात कोरोनाची मोठी साथ पसरली आहे. आपण चौथ्या स्टेजमध्ये आहोत. आतापर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी यावर उपाययोजना जाहीर करायला हव्या होत्या मात्र तसेच काहीही पंतप्रधानांनी केलेले नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली होती.