मुंबई : भारतीय जनता पक्षाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी दाखल झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
मात्र, उदयनराजे भोसले याठिकाणी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर लवकरच आणखी एक शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सध्या शरद पवार सिल्व्हर ओकवर आराम करत आहेत.
त्यात परमबीर सिंग यांच्या १०० कोटी हप्ता वसुलीच्या पत्रासंदर्भात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर शरद पवार घरातूनच पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. कालच अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख त्यांना भेटायला आले होते. त्यानंतर देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपादचा राजीनामा सोपवला होता.