सातारा : राज्यात पुन्हा एकदा शनिवार आणि रविवार असा दोन दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच येत्या दोन ते तीन दिवसात तीन आठवड्याचा लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज बोलताना दिले होते.
मात्र या निर्णयामुळे सर्व सामान्य नागरिकांवर आणि हातावर पोट असलेल्या कर्मचारी वर्गावर उपासमारीची वेळ येऊ शकते. या सरकार निर्णयाविरोधात आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. तसेच आघाडी सरकारच्या या निर्णयाविरोधात त्यांनी भीक मागो आंदोलन सातारा येथे केले होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या लॉकडाऊन निर्णयावर घणाघाती टीका केली होती.
खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर बसले होते. या प्रतिकात्मक आंदोलनानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या निर्णयाविरोधात सरकारला इशारा दिला आहे.
यावेळी उदयनराजेंनी सांगितले की, ही टाळेबंदी आम्हाला नको आहे. आमची जनता काय उपाशी मरणार का? जर पोलिसांना जनतेचा उद्रेक पाहावा लागला तर त्याला जबाबदार प्रशासन राहील, असा इशाराही उदयनराजेंनी दिला. यानंतर उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरफटका मारत शासनाच्या कारभाराचावरही जोरदार टीका केली होती.