मुंबई : मुंबईमध्ये दिवसाला १० हजार रुग्ण सापडत असल्यामुळे मुंबई मनपाच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. त्यात कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी मुंबईत कोरोना संदर्भातील नियम अधिक कडक केलेले असताना दुसरीकडे कोरोना लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. तसेच नागरिकांना सामील होण्याचे आव्हान मुंबई मनपाकडून केले जात आहे.
पण आता मुंबई मध्ये लसीचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती खुद्द मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. दरम्यान काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील लस पुरवठा करण्याबाबात केंद्राशी बोलणी सुरू असल्याचे म्हटले होते. त्यामुळे देशात सध्या लसीकरणामध्ये अव्वल असलेल्या महाराष्ट्राला कोरोना रोखण्यासाठी लसीचा अधिक पुरवठा करावा असे आवाहन पेडणेकर यांनी केले आहे.
दरम्यान पुढील काही दिवसांत खाजगी, सरकारी लसीकरण केंद्रांवर नागरिक गेले आणि तेथे लस नसेल तर पुन्हा त्यांना केंद्रांवर आणणं कठीण होईल तसेच दुसरा डोस देणं देखील अनिवार्य असल्याने त्याचे नागरिकही खोळंबले असल्याचं पेडणेकरांनी सांगितलं आहे. तसेच लसीकरणासोबतच सध्या सर्वत्र होत असलेला कोरोना रूग्णांचा विस्फोट पाहता नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे, अनावश्यक गर्दीची ठिकाणं टाळा आणि स्वयंशिस्त पाळा असेही महापौरांनी बजावलं आहे.