मुंबई- कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ठाकरे सरकारने निर्बंध कडक करण्याचे संकेत दिले आहेत. अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल सुरु रहाणार कि बंद होणार या संदर्भात सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहीले आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी महत्वाची बैठक बोलावली असून यावेळी राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान लोकल बंद होणार का हा प्रश्न मुंबईकरांना सतावत असून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.
“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा काँग्रेस पक्षाचे प्रमुख या तिघांनी लॉकडाउनसंदर्भात विचार केलेला नाही. या सगळ्या परिस्थितीत अधिक कडक निर्बंध कसे लावता येतील यावर चर्चा होणार आहे. कालच यावर नव्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आमच्या विभागाकडून फाईल गेली आहे. अंतिम निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल,” अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.