सध्या राज्यात कडक निर्बंध करूनदेखील अनेक नागरिक निष्काळजीपणे वागत असल्याचे चित्र समोर येत आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात येत असतानाही काही ठिकाणी मात्र नागरिकांचा बेजबाबदारपणा आताही पाहायला मिळत आहे. सरकार वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन देत आहे. मास्क वापरण्यास सांगत आहे. याचं पार्श्र्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना थेट हात जोडले आहेत. घरातून बाहेर पडू नका. डबल मास्क वापरा, असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना हात जोडून केलं आहे.
तसेच मुंबई महापालिकेनेही ट्विटर हँडलवरून मुंबईकरांना डबल मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. आधी चेहऱ्यावर सुती कपड्याचं मास्क लावा. त्यानंतर सर्जिकल मास्क लावा, असं आवाहन पालिकेने केलं आहे.
आपला मास्क विचारपूर्वक निवडा!
सर्व प्रकारचे मास्क सारख्याच प्रमाणात सुरक्षित असतील असे नाही. विविध प्रकारच्या मास्कविषयी जाणून घ्या.#NaToCorona pic.twitter.com/HiT5ZkJqjJ
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 30, 2021
N-९५ मास्क किंवा सर्जिकल मास्कमुळे ९५ टक्के सुरक्षा मिळते. तर सुती कापडाच्या मास्कमुळे शून्य टक्के सुरक्षा मिळते, असा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी कळकळीची नागरिकांना विनंती केली आहे, त्याचबरोबर गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, अशा शब्दांत सूर आळवल्याचे पाहायला मिळाले. सोबतच नागरिकांकडून त्यांनी सहकार्याची अपेक्षाही केली. सध्याच्या घडीला कोरोना काळात एकाच मास्कचा वापर न करता एका वेळी दोन मास्कचा वापर करत नाक आणि तोंड झाकण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.