राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यानंतर आता पवार यांची आज डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
‘पवारसाहेबांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि १५ दिवसानंतर जर त्याचे शरीर चांगले साथ देत असेल तर त्यांच्या पित्ताशयावर आणखी एक शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांना, कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना विनंती आहे की, त्यांना बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असल्याने त्यांच्या भेटीस जाण्याचे टाळावे, असं महत्त्वपूर्ण आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.
शरद पवार यांच्या पोटात अचानक दुखू लागल्याने मंगळवारी सायंकाळी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होते. वास्तविक बुधवारी शरद पवार यांना रुग्णालयात अॅडमिट करून त्यांची शस्त्रक्रिया केली जाणार होती. पण अचानक पोटात दुखत असल्याने मंगळवारीच अॅडमिट करण्यात आले आणि त्यानंतर तात्काळ त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट करत रात्री उशिरा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती.