नागपूर : एकीकडे मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारच्या अडचणी वाढवत असताना दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुर येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं छेडले आहे.
नागपुराती बहूचर्चित एकनाथ निमगाडे हत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून नागपूर येथील फडणवीसांच्या घरासमोर आंदोलन केले आहे. त्यामुळे घराजवळ असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची तारंबळ उडाली होती.
प्रकरण असे की, निमगडे यांच्या हत्याप्रकरणात नाव समोर आलेला कुख्यात गुंड रणजीत सफेलकर याचे भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यासोबत संबंध असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आला आहे.
तसेच, एकनाथ निमगाडे यांच्या हत्याप्रकरणात फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र पोलिसांनी संवाद भूमिका घेत आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले होते.