बारामती : राज्यात विशेष करून मुंबई आणि पुणे सारख्या शहरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहेत याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांसोबत पुणे आणि बारामती येथे वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाच्या मुद्द्यावर बैठकीचे आयोजन केले होते.
बारामती शहर आणि तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका. कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले होते.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात करोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक’ पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. सद्यस्थितीत बारामती तालुक्यात शासन आणि प्रशासन यांच्यामार्फत विविध उपाययोजना करून देखील बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंतेची असून साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांर्भीयाने घेणे आवश्यक आहे.
बारामती तालुक्यातील प्रत्येक रूग्णालयाचे फायर ऑडीट प्राधान्याने करून घेण्यात यावे. प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यावी. सांगली जिल्ह्यात जसे मोबाइल करोना चाचणी व्हॅन प्रत्येक गावात जावून नागरिकांची करोनाची तपासणी केली जाते, त्याच धर्तीवर बारामती तालुक्यातही मोबाइल व्हॅनद्वारे तपासणी करण्यात यावी अशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत.