राज्यासह मुंबईत करोनाचा प्रसार हा झपाट्याने वाढत आहे. यातच मुंबई महानगर पालिकेकडून नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होण्याचे संकेत येत असताना देखील मुबंईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करोनाची बाधित असतानाही अभिनेत्र क्वारंटाइन न राहता सार्वजनिक ठिकाणी फिरली. त्याचबरोबर तिने शुटिंगमध्ये भाग घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेनं सदरील अभिनेत्री विरोधात तक्रार केली. त्यावरून ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेनं ट्विटर हॅण्डलवरून या घटनेची माहिती दिली आहे. त्याचबरोबर नागरिकांनाही करोना नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांनाही इशारा दिला आहे. “नियम सर्वांसाठी सारखेच! करोना विषाणू संबंधीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अभिनेत्रीविरुद्ध बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईकरांनो, कृपया सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा,” इशारा वजा आवाहन महापालिकेनं केलं आहे. हा गुन्हा अभिनेत्री गौहर खान विरुद्ध नोंदवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
नियम सर्वांसाठी सारखेच!
कोरोनाविषाणू संबंधीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अभिनेत्रीविरुद्ध बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईकरांनो, कृपया सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा.#NaToCorona pic.twitter.com/EtEgKHfwRW
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 15, 2021
अभिनेत्रीची करोना चाचणी करण्यात आली होती. चाचणीच्या अहवालानुसार अभिनेत्री करोना पॉझिटिव्ह असल्याचं ११ मार्च रोजी निष्पन्न झालं. त्यानंतर घरात विलगीकरणात राहणं सक्तीचं असताना अभिनेत्री नियमांचं उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी फिरणं सुरूच ठेवलं. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटांच्या शुटिंगमध्येही अभिनेत्री सहभागी झाली होती. आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली.