सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजवायला सुरवात केली आहे. त्यातच राज्यात सुद्धा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यापूर्वी १० वी’च्या परीक्षा शिक्षण विभागाने रद्द केल्या आहेत तर १२ वी’ च्या परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्यातच आता राज्यात कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेणं अशक्य आहे. त्यामुळे राज्यातील १३ विद्यापीठातील उर्वरित सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. या विद्यापीठांमध्ये कृषी विद्यापीठाचा समावेश नाही.
कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने काही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत विचार सुरू होता. पण कोरोना प्रतिबंधक निर्बंध आता आणखी कठोर करण्यात आले आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणं अवघड होणार आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाईनच घेण्यात येतील, असं सामंत यांनी सांगितले आहे. मात्र परीक्षा ऑनलाईन घेत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्याची सूचना सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना केली आहे.
तसेच कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता विद्यापीठ, महाविद्यालये आणि संस्थाचालकांनी घ्यावी, अशी सूचना गुरुवारी झालेल्या बैठकीत करण्यात आल्या आहेत. १३ ही अकृषी विद्यापीठांमध्ये परीक्षा थांबल्या नाहीत. काही ठिकाणी ऑफलाईन तर काही ठिकाणी ऑनलाईन स्वरुपात या परीक्षा सुरू होत्या. पण बुधवारी (21 एप्रिल) राज्यातील निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. अशा स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नाही.