मुंबई : राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. या घोषणेनंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दुजोरा दिला होता. मात्र काही वेळातच आदित्य ठाकरे यांनी मोफत लस देण्याच्या निर्णयाचे ट्विट डिलीट केले होते. याच मुद्द्यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी ट्विट डिलीट केलं, त्या मुद्द्यावर मी बोलणार नाही. हा सरकारचा विषय आहे. सरकार या बद्दलचा योग्य तो निर्णय घेईल. जर विरोधकांकडून या बद्दल काही सूचना करण्यात आल्या असतील तर त्यावरही नक्कीच विचार केला जाईल. मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसात अनेक निर्णय घेतले आहेत.आदित्य ठाकरे हेदेखील कॅबिनेटचे सदस्य आहेत. जनतेच्या हिताचे निर्णय हे कायम राजकारण बाजूला ठेवूनच घेतले जातात.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ठाकरे सरकारला संकटाचा संधी म्हणून वापर करून त्याचं राजकारण करण्याची गरज नाही. हे सरकार प्रत्येक पाऊल नागरिकांचा जीव वाचावा म्हणून टाकत आहे. त्यामुळे लसीकरणाचा जो निर्णय होईल त्याबद्दल सरकारमधील प्रमुख मंत्री स्वत: निर्णय जाहीर करतील”, अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंबद्दलच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.