राज्यात सध्या अनेक विषयांवरून राजकारण ढवळून निघालं आहे . संधी मिळताच कोणत्या ना कोणत्या विषयावरून भाजप सरकारवर टीका करत असते. जेव्हा महाविकासआघाडी सरकारला टोला लगावत होते तेव्हा त्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत माध्यमांच्या साहाय्याने किंवा सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर देत होतेच. मात्र रविवारी सामनामधील रोखठोक मधून राऊतांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच निशाणा साधला आहे. देशमुखांकडे गृहमंत्री पद अपघाताने आलं असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेवर स्वत: अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देत खासदार संजय राऊत यांना इशारा दिला आहे. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम करु नये. यावेळी बारामतीत अजित पवार यांना पत्रकारांनी या बाबत विचारणा केल्यानंतर पवार यांनी रोखठोक शैलीत राऊत यांना इशारा दिला आहे.
काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना, शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना तर राष्ट्रवादीत शरद पवार यांना कोणाला मंत्री करायचे याचा अधिकार आहे. त्यामुळे ते याबाबतचा निर्णय घेत असतात. महाविकास आघाडीबद्दल त्रयस्थाने वक्तव्य करणे समजू शकतो, पण घटक असलेल्यांनी अशी विधाने करणे योग्य नाही, अशा शब्दात पवार यांनी या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली.