मुंबई : कोरोना रुग्णांना जीवनदायी ठरणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी चेंबूरच्या शताब्दी रुग्णालयात लवकरच ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने आरसीएफ कंपनीच्या साहाय्याने येत्या दोन ते तीन आठवड्यांत हा ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात येणार आहे. यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊन हजारो कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अशाच रीतीने दक्षिण-मध्य मुंबईतील अन्य कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये बीपीसीएल, एचपीसीएल, इंडियन ऑइल यांच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लान्ट उभे करण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान लागणाऱ्या ऑक्सिजनचा राज्यभरात तुटवडा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी बाहेरील राज्यांतून ऑक्सिजन मागविला जात आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला आहे.
खासदार शेवाळे यांच्या पुढाकाराने, पूर्व उपनगरातील ‘पं. मदन मोहन मालविय शताब्दी रुग्णालया’च्या डीन डॉ. माने आणि एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत झालेल्या प्राथमिक बैठकित ऑक्सिजन प्लान्ट उभारणीच्या योजनेला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी आरसीएफ कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून मदत करण्यास तयारी दर्शविली असल्याची माहिती खासदार शेवाळे यांनी दिली आहे. या प्लान्टमधून 9 किलो ऑक्सिजन असणाऱ्या सुमारे 102 सिलेंडर्स चा पुरवठा केला जाणार असून येत्या दोन-तीन आठवड्यांत हा प्लान्ट कार्यन्वित केला जाणार आहे.