राम कृ्ष्ण हरी! वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर सज्ज, श्री विठ्ठल मंदिराला करण्यात येतेय आकर्षक सजावट

वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपूरात लगबग सुरू


वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर सज्ज

पंढरपूर- आषाढीवारीच्या धर्तीवर पंढरपूरच्या विठूरायाचे मंदिर हे राजवाड्यासारखे सजू लागले आहे. पंढरपूरच्या मंदिरामध्ये पडदे, झुंबरे आणि रंगे-बेरंगी रोशनाई करण्यात येत आहे. मंदिरातील पेशवेकालीन सभा मंडपाला तसंच रुक्मिणी मातेच्या सभामंडपाला आता शिवशाही साज देखील चढवण्यात आला आहे. याचसोबत आकर्षक फुलांच्या रंगसंगतीचा वापर करून संपूर्ण मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

दुसरीकडे मंदिर परिसरात उष्णतेपासून बचावासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून शेडनेटचे छत देखील तयार करण्यात आले आहे. यामुळे वारकऱ्यांचा उष्णतेपासून बचाव होणार आहे. तर विठूरायाच्या मंदिर परिसरात दर्शन रांगेतील सर्व मार्गावर उष्णतारोधक पांढऱ्या रंगांचे पट्टे देखील मारण्यात आले आहेत. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांना यामुळे मंदिरात गारवा अनुभवता येणार आहे.

सध्या विठूरायाच्या नामस्मरणात तल्लीन होत लाखो वारकरी हे देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर, शेगांव अशा विविध ठिकाणाहून संतांच्या मानाच्या दिंड्यांसह पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. अशात या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विठूरायाची नगरी देखील सजत आहे. येत्या २९ जूनला आषाढी एकादशी दिवशी या संतांच्या दिंड्या पंढरपूरात दाखल झाल्या होणार आहे. या सर्व संताच्या दिंड्यांचे आणि वारकऱ्यांचे स्वागत दिमाखात व्हावे यासाठी पंढरपूरनगरी मोठ्या उत्साहात तयारी करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *