माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रामुळे आघाडीवर संक्रात आली आहे. हाच मुद्दा पकडत विरोधकांनी सुद्धा महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. या विषयाला धरून आजच्या सामना अग्रलेखातून शिसवेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.
परमबीर सिंग यांचे पत्र ज्यांना इतके महत्त्वाचे वाटले, त्यांनी अनुप डांगे या पोलीस अधिकाऱ्याने परमबीर यांच्याबाबत लिहिलेल्या पत्रासही मस्तकी लावून न्याय केला पाहिजे. भाजपचा हा सर्व खटाटोप का व कशासाठी चालला आहे ते जनतेला माहीत आहे. राष्ट्रपती राजवट लावून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची हाच त्यांचा मुख्य हेतू आहे.
राज्याच्या गृहमंत्र्यांवर वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अद्यापि शासनाच्या सेवेत आहेत याचे आश्चर्य वाटायला हवे. परमबीर सिंग यांनी फक्त गृहमंत्र्यांवर आरोपच केले नाहीत, तर आपण केलेल्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी यासाठी हे महाशय सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत.
दुसरे एक अधिकारी संजय पांडे यांनीही मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून ‘बढती’प्रकरणी आपल्यावर कसा अन्याय झाला हे स्पष्ट केले. पांडे यांनी त्यांच्या पत्रात इतरही बरेच मुद्दे उपस्थित केले आहेत. राजकीय दबाव, बरी-वाईट कामे करून घेण्याविषयी सरकारचे दाबदबाव याविषयी स्फोट केले आहेत. पांडे हे महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत, पण पोलीस आयुक्त, राज्याच्या महासंचालकपदी नेमणुकांत त्यांना डावलले गेल्याचा आरोप त्यांनी केला. पांडे व परमबीर सिंग यांनी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या इथपर्यंत सर्व ठीक, पण या भावना प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचतील व सरकारच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण होईल याची चोख व्यवस्था त्यांनी केली आहे. या दोन पत्रांचा आधार घेऊन राज्यातील विरोधी पक्ष जो नृत्याविष्कार करीत आहे तो मनोरंजक आहे.
संजय राऊत परमबीर सिंह शिवसेना देवेंद्र फडणवीस
या जोडीला सुबोध जयस्वाल, रश्मी शुक्ला वगैरे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सरकारला अंधारात ठेवून केलेल्या ‘फोन टॅपिंग’ प्रकरणाचा अहवाल घेऊन विरोधी पक्षनेते दिल्लीदरबारी पोहोचले आहेत. म्हणजेच, राज्याच्या प्रशासनातील हे लोक एका राजकीय पक्षाची सेवा बजावत होते. विरोधी पक्षाने महाराष्ट्रातील सरकार खिळखिळे करण्यासाठी या अधिकाऱ्यांशी संगनमत केले आणि अस्तनीतील हे निखारे राज्य सरकारने पदरी बाळगले होते. ज्या सरकारचे किंवा राज्याचे मीठ खातो त्याच राज्याची बदनामी करण्याचे हे कारस्थान आहे व त्यामागे राज्यातील उठवळ विरोधी पक्षाचा हात आहे हे आता स्पष्ट झाले आहे.
गुजरातचे तत्कालीन राज्यकर्ते हे कसे भ्रष्ट, अनैतिक कार्यात गुंतले होते व त्या कामी पोलीस दलाचा कसा गैरवापर झाला हे भट्ट यांनी सांगितले व त्या बदल्यात भट्ट यांना खोट्या आरोपांत गुंतवून तुरुंगात डांबले. हे झाले गुजरातचे, पण श्रीरामभूमीत म्हणजे भाजपवाल्यांच्या ‘योगी’ राज्यातही वैभव कृष्ण या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मुख्यमंत्री योगींना पत्र लिहून राज्यात बदल्या-बढत्यांबाबतचे ‘दरपत्रक’च समोर आणले. योगी सरकारच्या गृहखात्याचा पर्दाफाश करणाऱ्या या पत्रावर केंद्रीय गृहखात्याने काय कारवाई केली हे महाराष्ट्रात फुदकणाऱ्या भाजपवाल्यांना सांगता येईल काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. संजय राऊत परमबीर सिंह शिवसेना