मराठी साहित्य संमेलनात होणार खान्देशी लोककलांचे सादरीकरण


साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशातील लोककला आणि लोकसंगीत यांचेही सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे या लोककलांचे सादरीकरण त्या-त्या लोककलांचे तज्ञ व पारंपारिक पद्धतीने सादरीकरण करणारी मंडळे सादर करणार आहेत. या संमेलनात खान्देशी संस्कृतीचे दर्शन घडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

दि.३ रोजी दुपारी २.३० ते ४.३० वा. सभामंडप ३ – बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात लोककला / लोकसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे संयोजन बापू हटकर व रमेश धनगर करणार आहेत. या कार्यक्रमात खान्देशी वीरनृत्य, बंजारा नृत्य, धनगरी नृत्य, आदिवासींची पावरी नृत्य, नंदीबैल नृत्य, डोगऱ्यादेव वळीत नृत्यांबरोबरच खान्देशी वन्हे, तमाशा बतावणी, टिंगरी वाला, गोंधळ, भारूड, शाहिरी, संबळ, पावरी, खान्देशातील लोकगीते ज्यात आखाजी, कानबाई, गौराई, लग्नाची गाणी आदी लोकगीते देखील सादर होणार आहेत.
यात ‘कर्ण जन्मानी कहानी’ हे भावस्पर्शी अहिराणी काव्यमय सादरीकरण हे खास आकर्षण राहणार आहे. या सर्व लोककला प्रकारातून जवळपास दीडशे लोककलाकारांना संधी मिळणार आहे, असे संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ अविनाश जोशी, आयोजन समितीचे रमेश पवार, संयोजक बापूसाहेब हटकर, रमेश धनगर, वसुंधरा लांडगे यांनी सांगितले.

खान्देशी संस्कृतीचे दर्शन
याच दिवशी सभामंडप क्र. २ कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात दुपारी १२.३० ते १.३० वा खान्देशी बोलीभाषांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर या बोलीभाषांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. रमेश सूर्यवंशी (अहिराणी), अशोक कोळी (तावडी), डॉ. पुष्पा गावीत (भिल्ली), डॉ. जतीनकुमार मेढे (लेवा गणबोली), डॉ. सविता पटेल (गुर्जर) हे सहभागी होतील. रात्री रात्री ८ ते १० वा. सभामंडप क्र १ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या रचनांवर आधारित “अरे संसार संसार” हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यात ‘परिवर्तन’ गृपतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, हर्षल पाटील व सहकलाकार सहभागी होतील.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *