पुणे : सध्या राज्यात मोठया संख्याने रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे. त्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात विविध मुद्द्यावरून वाद होताना दिसत आहे. त्यातच कोरोना काळातील वैद्यकीय मदतीवरून होत असलेल्या आरोप- प्रत्यारोपाने राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. या वादात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसी, ऑक्सिजन, रेमडिसिविर, व्हेंटिलेटर असे सर्व उपचार साहित्य केंद्र सरकारकडे आहे. मात्र याचा सुरळीत पुरवठा राज्यांना होत नाही.केंद्र सरकारने राज्यांवर अन्याय केला आहे. ते आज पुण्यात खासदार राजीव सातव यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलेले असताना पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.
जागतिक पातळीवर मदत सुरू झाली आहे. अनेक देश राज्याला मदतीसाठी पुढे आले आहेत. मात्र आता कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात यावे अशीही मागणी त्यांनी केली होती. कोरोना काळातील रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण या परिस्थितीत ज्यांनी रुग्णांच्या उपचारासाठी पुढे येत कोविड सेंटर सुरू केले त्यांचं अभिनंदन देखील पटोले यांनी यावेळी बोलताना केले.