ग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय आणि महाराष्ट्रातील पहिले शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. विद्यापीठस्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याची घोषणा सोमवारी करण्यात आलेली आहे. या घोषणेमुळे पुन्हा एकदा मराठी पताका सातासमुद्रापार फडकला आहे.
‘कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप’ या नावाने ४०० युरोची ही शिष्यवृत्ती इटलीतील सॅमनिटे प्रांतातील दहा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. सदर प्रस्तावाची बेनव्हेंटोचे महापौर आणि कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी छाननी करणार आहे.
यामध्ये ज्या विद्यार्थ्यांन शिष्यवृत्ती दिली जाणार आहे त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्व बाजूंचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर या मुलांची निवड करणार असून, पुढील दहा वर्षे १०० मुलांना ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.