मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने, खासदार राहुल शेवाळे आणि ‘साहस वेल्फेअर फाऊंडेशन’च्या वतीने साकारण्यात आलेल्या ‘काळाच्या पलीकडचा महामानव’ या विशेषांकांचे प्रकाशन माननीय राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते चैत्यभूमी येथे करण्यात आले.
चैत्यभूमी येथे आयोजित केलेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार भालचंद्र मुणगेकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यांसह या विशेषांकामध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रांतले योगदान अधोरेखित करणारे लेख लिहून अनोखी आदरांजली वाहिली आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिकरित्या जयंती साजरी करण्यावर निर्बंध असताना खासदार राहुल शेवाळे आणि ‘साहस वेल्फेअर फाऊंडेशन’ यांनी अनोखा वैचारिक जागर करून जयंती साजरी करण्याच्या हेतूने ‘काळाच्या पलीकडचा महामानव’ हा विशेषांक साकारला आहे. यात अर्थ, शिक्षण, कृषी, सामाजिक, राजकीय, कामगार कायदे या आणि अशा अन्य क्षेत्रांतील बाबासाहेबांचे योगदान अधोरेखित केले आहे.
यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले, अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. भालचंद्र मुणगेकर, आंबेडकरी विचारवंत ज वि पवार, लेखिका मल्लिका नामदेव ढसाळ,ज्येष्ठ संपादक संजय आवटे, धम्मसेवक नागसेन कांबळे, पत्रकार महादू पवार यांचे लेख असून सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, गायक आदर्श शिंदे यांच्या मुलाखती आणि पत्रकार कवी भीमराव गवळी यांच्या कवितेचा समावेश आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी या विशेषांकांचे अतिथी संपादक पद भूषविले असून साहस फाऊंडेशन च्या वतीने संपादन करण्यात आले आहे.