पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात पुण्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर आता रात्री-अपरात्री कोरोना उपचारासाठी बेड्स उपलब्धतेची माहिती मिळाली यासाठी कॉल सेंटरचे विस्तारीकरण करण्यात आले आहे.
तसेच पुणे शहरातील कोरोनाची एकूण स्थिती पाहता खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बेड्सची उपलब्धता आणि भविष्यातील आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सची गरज, यावर सविस्तर आढावा महापौर मोहोळ यांनी घेतला.
याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘८० टक्के बेड्स ताब्यात घेतल्यानंतर जवळपास ७००० हजार बेड्स कोविडसाठी उपलब्ध होणार आहेत. शिवाय महापालिकेने सीसीसीचे ५ हजार बेड्स तयार करण्याचे नियोजन केले असून पैकी १ हजार २५० बेड्स उपलब्ध झाले आहेत. शिवाय १ हजार ४५० बेड्सची तयारी सुरु आहे’.