‘लालबागचा राजा’ची दरडग्रस्तांच्या वेदनांवर मायेची फुंकर

लालबागचा राजा' मंडळाने इर्शाळवाडीतील पीडित अनाथ मुलांचा विश्वासाने धरला हात


मुंबई (रवींद्र मालुसरे) मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान सर्वांच्या नजरा प्रसिद्ध ‘लालबागच्या राजा’कडे लागल्या असतात. लालबागच्या राजाला ‘नवसाचा गणेश’ अशी ख्याती आहे. ज्या काळात स्वातंत्र्यलढा शिखरावर होता त्या काळात मंडळाची स्थापना झाली. मुंबईसह देश-विदेशातील गणेशभक्त लालबागचा राजाच्या चरणी लाखो भक्त नतमस्तक होत असतात.

लालबागचा राजाचे यंदा हे ९० वे वर्ष असून, सोबतच भक्तांसाठी मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. ‘पान-सुपारी’ हा त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि लालबागच्या राजाच्या परंपरेतील महत्त्वाचा कार्यक्रम असतो.

‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आपले लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि देशभरातील ‘राजा’चे तमाम गणेशभक्त तुमच्या दुःखात सहभागी आहेत. आता पुन्हा मोठ्या जोमाने उभे राहायचे आहे. समोर आलेल्या अडचणींवर मात करून दुःखाचा डोंगर सर करून आपल्याला पुढे जायचे आहे. या प्रवासात आम्ही सर्व तुमच्या साथीला आहोत’, अशा शब्दांत ‘लालबागचा राजा’ मंडळाने इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांना धीर देत  इर्शाळगाडीवासीयांनी भोगलेल्या वेदनांवर, त्यांच्या जखमांवर ‘लालबागचा राजा’ने मायेची फुंकर घातली. निमित्त होते, पान-सुपारी’मध्ये मंडळाकडून आपले सामाजिक दायित्व जपले जाते. यापूर्वीही २००५ मध्ये दासगाव येथील जुई दरडग्रस्थ गाव नव्याने उभारण्यात मंडळाने माजी आमदार स्व माणिकराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन नव्याने उभे केले होते.

जुलै महिन्यात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळवाडीवर मुसळधार पावसामुळे डोंगराचा वरचा कडा तुटून पडला. घरे राडारोड्याखाली गाडली गेली. दुर्दैवी इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. जी वाचली त्यातली काही कायमची जायबंदी झाली, तर काही मुले अनाथ झाली. या सर्व आपत्तीग्रस्तांना लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे. मंडळाकडून इर्शाळवाडीतील २९ कुटुंबातील वाचलेल्या सदस्यांना पन्नास हजार रुपयांचा डिमांड ड्राफ देण्यात आला आहे. तसेच २२ अनाथ मुलांच्या नावाने प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची एफडी बनवण्यात आली आहे. उत्सव मंडळ या सर्व मुलांच्या पाठीशी आहे’, ‘लालबागाचा राजा’ मंडळाने मदतीसाठी खारीचा वाटा उचलला आहे. अशी प्रतिक्रिया मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.

मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जगात मदतीची भावना कमी झाली आहे असा सूर नेहमीच ऐकू येतो. परंतु या गोष्टींना छेद देणारे सुखद अनुभव मंडळाच्या वतीने देत असतो.  त्यामुळे सदभाव  जगात कायम असल्याची भावना मनात ठसते.  आपले समाजाविषयी काही देणे लागते, या उदात्त व शुद्ध भावनेने समाजातील उपेक्षित घटक, वनवासी यांना यथाशक्ती मदत

करण्याची मनात खूणगाठ बांधून “स्वतःसाठी सर्वच जगतात, पण स्वतःसाठी व इतरांसाठी जगणे यात वेगळाच आनंद आहे व आत्मिक समाधान आहे. संस्थेच्या माध्यमातून एखाद्याच्या जीवनात थोडासा आनंद निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कार्यास मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि भाविक भक्तांचेसुद्धा मोठे योगदान आहे.

मंडळातर्फे आयोजित करण्यात आणलेल्या ‘पान-सुपारी’ कार्यक्रमाच्यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, स्थानिक खासदार अरविॅद सावंत, स्थानिक आमदार अजय चौधरी आणि सिनेनिर्माते प्रवीण तरडे उपस्थित होते.
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी आलेल्या इर्शाळवाडीमधील ग्रामस्थ गणपत पारधी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना सांगितले की, ‘ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी मी झोपेत होतो. मातीच्या ढिगाऱ्यातून मी बाहेर पडलो. ते चित्र डोळ्यासमोर आले तरी मन सुन्न होते. या दुर्घटनेत आम्ही नातेवाईक गमावले. आजही आमच्या राहत्या घरांवर ३० फुटांचा मातीचा ढीग आहे. आम्ही आता नव्याने आमचे छप्पर उभारतो आहोत. आज पहिल्यांदा मुंबईत आलो. श्रीगणेशाचे देखणे रूप पाहून मनाला काहीशी शांतता मिळाली आहे.’  तर सचिन पारधी या विद्यार्थ्याने  आमचे गाव, शाळा, मित्र आणि त्यांच्या आठवणी त्या ढिगाऱ्यात गुदमरल्या आहेत. आमचा स्थानिक रोजगार आता पूर्णपणे बंद झाला आहे. बहुतांश गावकरी बेरोजगार झाले आहेत. भक्तांनी श्रीगणेशाच्या चरणी दिलेल्या दानातून आम्हाला आर्थिक मदत मिळाली. आर्थिक पाठबळ आणि बाप्पाचा आशीर्वाद यानिमित्ताने आम्ही स्वतःसोबत गावाकडे घेऊन जाणार आहोत’ अशी भावना व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *