भाजपाचे खासदार नारायण राणे यांना आयकर विभागाच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
नारायण राणे व नितेश राणे यांनी निवडणूक आयोगाला दिलेली माहिती ही संशयास्पद असून फसवणूक केल्याचा खळबळजनक आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी केला आहे.
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला स्वतःची माहिती व आर्थिक तपशील निवडणूक आयोग व माहिती अधिकार आयोग यांना देणं गरजेचं असते. परंतु राणे पिता- पुत्रानी दिशाभूल केल्याचा आरोप करत प्रदीप भालेकर यांनी नितेश राणे व नारायण राणे यांची खासदार व आमदार हे पद रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे केली आहे.
खासदार पदाच्या निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्र सादर करताना त्यात राणे पिता पुत्र यांनी बँकेतील बॅलन्स, एकूण वार्षिक उत्पन्न, दागिने तसेच आयकर बाबतचा तपशील दिला,परंतु गोव्यातील नीलम द ग्रँड’ आणि ‘नीलम द ग्लिटज’ या दोन हॉटेल संदर्भातील माहिती या तपशिलात नमूद नसल्याने त्यांच्यावर फसवणूक केल्यासंदर्भात कारवाई दाखल करण्यात यावी असे प्रदीप भालेकर यांनी सांगितले.
भालेकर यांच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेत राज्य निवडणूक आयोग यांनी संबंधित प्रकरण आयकर विभागाकडे सोपविले आहे.दरम्यान याबाबत आयकर विभाग चौकशी करून संबंधित प्रकरणावर योग्य निर्णय देईल याची मला खात्री आहे. असे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी सांगितले.