बीड- राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. यात बीडमध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने अनेक गोष्टीचा तुडवडा निर्माण होत आहे. बेडची कमतरता भासत आहे.रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन रूग्णांना वेळेवर मिळत नाहीये. यामुळे बीडची स्थिती आणखी खराब होत चालली आहे. यावर आता बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन लवकर उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे. येत्या दोन दिवसात बीडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल, अशी माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
त्यामुळे थोडा का होईना पण नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सोबतच इतर आरोग्य सुविधांच्या बाबतीतील देखील अडचणी दूर होतील, असं आश्वासन देखील धनंजय मुंडे यांनी दिलं. बीडमध्ये ३५० बेड वाढवले जाणार आहेत. त्याशिवाय लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटर पूर्ववत सुरू करण्यात आलं आहे. या बरोबरच अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात १५० बेड वाढवणार आहेत, अशी माहिती धनंजय मुंडे दिली आहे.