मुंबई : महाराष्ट्राला लसीचा मुबलक प्रमाणात पुरवठा होत नाही आहे. लस पुरवठा मुद्द्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात शीतयुद्ध पेटले आहे. त्यात लसीअभावी अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहेत.
याच मुद्द्यावरून आजच्या सामना अग्रलेखातुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना भिडे गुरुजींच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावे लागेल, असं आजच्या अग्रलेखात म्हटलंय.
कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, मुंबईत लसीचा ठणठणाट आहे व पंतप्रधानांनी ‘लस उत्सव’ साजरा करण्याचे फर्मान सोडले. पंतप्रधानांचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचे पार्सल घेऊन यावे. राजकीय भांडणे आहेत, पण त्या भांडणात आपल्याच लोकांचे जीव का घ्यायचे? असा सवाल आजच्या सामना आघारलेखातून विचारण्यात आला आहे.
पुढे भिडे गुरुजींच्या वक्तव्यावर भाष्य करताना सामना अग्रलेखात म्हंटले आहे की, कोरोना या विषाणूने हाहाकार माजवला आहेच, पण त्यामागचे राजकारण हे जणू तांडवच करू लागले आहे. माणसे सरणावर चढत आहेत व त्यांच्या मढ्यांवरून वादावादी सुरू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे असे कधीच घडले नव्हते. कोरोना हा मानवनिर्मित की दैवी कोप? यावर बरेच वाद झाले, पण सांगलीचे शिवभक्त अवलिया भिडे गुरुजी यांनी वेगळाच सिद्धांत मांडला आहे.
‘जे ‘गांडू’ आहेत त्यांना कोरोना होणारच. कोरोनामुळे जे मरणार आहेत ती माणसे जगायच्याच लायकीची नाहीत,’ असा विचार सांगलीच्या या अवलियाने मांडल्यामुळे बहुधा लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी स्वतःचे उद्योग गुंडाळायला घेतले असतील.असा टोला त्यांनी लगावला आहे.