शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामधून करण्यात आलेल्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलं असून आल्याने घाव वर्मी बसला असल्याचं म्हटलं आहे. याच देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावल्यानंतर खासदार संजय राऊत यांनीदेखील त्यांना उत्तर दिलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सकाळी नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सामना संपादकीयमधून करण्यात आलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जनहिताचे मुद्दे उचलणं जशी आमची जबाबदारी आहे तशी वृत्तपत्रांचीदेखील आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे हे लक्षात आलं आहे”.
याच मुद्यावर शिवसेना नेते संजय राऊत याची प्रतिउत्तर दिलंय. “सामना वाचतात हे त्यांनी कबुल केलं. सामना वाचणं सुंदर सवय आहे. महाराष्ट्र, देशात सत्य काय घडतंय त्याची माहिती सामनामधून मिळत असते. संपूर्ण जग सामनाची दखल घेतं. त्यामुळे देवेंद्रजींना चांगली सवय लागली असेल तर मी त्यांचं कौतुक करतो”. असे संजय राऊत म्हणाले.