नाशिक– कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात हाहाकार पसरला आहे. अश्यातच नाशिक जिल्ह्यातील काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येवला तालुक्यातील राजापूर गावात जाधव कुटुंबातील तब्बल पाच जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
७५ वर्षाच्या मालनबाई जाधव या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्या दोन्ही मुली आईला बघण्यासाठी मुंबईहून नाशिकला रवाना झाल्या.परंतु दुसऱ्याच दिवशी दोन्ही मुली व घरातील इतर सदस्य आजारी पडले.व त्यांनंतर आठवड्याभरात जाधव कुटुंबातील पाच सदस्यांचा कोरोनाची लागण होऊन दुर्दैवी अंत झाला.
मुलगा अरुण जाधव (५८ वर्षे), नातू अमित जाधव (३५ वर्षे), पहिली मुलगी शोभा सातदिवे (६० वर्षे) आणि दुसरी मुलगी छाया वाघ (५९ वर्षे) यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
संबंधित घटनेमुळे गावकरी भयभीत झाले असून जाधव कुटुंबांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबई ,पुणे नाशिक व इतर जिल्ह्यांमधील मधील कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता आरोग्य प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
आतापर्यंत देशात २४ तासात तब्बल दोन लाखांच्यावर नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकट्या नाशिक मध्ये 37 हजार 753 कोरोना बाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाढती रुग्णसंख्या व आरोग्यसेवेचा निर्माण होणारा तुटवडयामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये या साठी आरोग्य प्रशासन २४ तास प्रयत्नशील आहेत.