नवी दिल्ली : सध्या विविध मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यात सचिन वाझे प्रकरण, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरील फोनटॅप प्रकरण त्यामुळे राज्यातील वातावरण गढूळ झाले आहे. त्यातच आत दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार , माजी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात अहमदाबाद येथे गुप्तभेट झाल्याचे वृत्त दिव्य भास्कर या वृत्तपत्राने दिले आहे. या भेटीनंतर येत्या काही दिवसातच महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दिव्य भास्करच्या बातमीनुसार , पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही निवडक ज्येष्ठ नेते शुक्रवारी संध्याकाळी खासगी जेट विमानाने अहमदाबाद येथे गेले होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास ते अहमदाबादला पोहचले. त्यानंतर अहमदाबाद विमानतळावरून हे नेते थेट शांती आश्रम येथील एका गेस्ट हाऊसवर गेले.
तसेच मंत्री अमित शाह हे काही मोजक्या भाजप नेत्यांबरोबर आधीच हजर होते. बंद दाराआड पवार, शहा आणि पटेल यांच्यात गुप्त बैठक झाली. तब्बल दोन तास ही बैठक सुरू होती. पण त्यात नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली ते मात्र कळू शकलेले नाही.