पुणे- मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मेहबुब शेख यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निकटवर्तीय असलेले राजेश विटेकर यांनी माझ्यासोबत अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेने भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप लावले आहेत. दबावापोटी पोलीस राष्ट्रवादीच्या या नेत्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही असं तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
त्यांची आई विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून माझ्यावर वारंवार खोटे आरोप करण्यात येत आहे, गृहखातं आमचं आहे, सत्ता आमची आहे, माझ्याविरोधात गुन्हा दाखल करू शकणार नाही. बंदुकीचा धाक दाखवून, लग्नाचं अमिष दाखवून माझ्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषण केले. गेल्या वर्षभरापासून मी या अत्याचाराविरोधात पोलीस स्टेशनला गेले, परंतु कोणीही माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. शरद पवार साहेब मला मुलगा मानतात, ते माझ्यावर गुन्हा दाखल होऊ देणार नाहीत असं विटेकरांनी धमकावण्यात आलं असल्याचं आरोप या महिलेने केला.
मुलींची अब्रु लुटायची आणि त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करायचा हा कुठला प्रकार? सुप्रिया सुळेंकडे मी अनेकदा तक्रार केली परंतु माझी दखल घेतली नाही, मी जिवंत आहे म्हणून तुम्हाला न्याय देऊ वाटत नाही का? राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांना पाठिशी घालण्याचं काम करत आहे, मला आणि माझ्या कुटुंबीयांना विटेकर यांच्याकडून धोका असल्याचं पीडित महिलेने दावा केला आहे.