यवतमाळ । पशूंनाही लाजवेल असे क्रूर कृत्य काही अज्ञात लोकांनी केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाघांच्या कातडीला आणि वाघ नख्यांना खूप मागणी आहे,त्यामुळे बेकायदेशीररित्या गैरमार्गाने वाघ नखे आणि त्यांच्या कातडीची तस्करी केली जाते.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनविभागअंतर्गत मुकुट बन परिक्षेत्रातील मांगुर्ला वनक्षेत्रातील राखीव वन कक्षामध्ये गस्त घालत असताना वनरक्षकाला एक वाघीण मृत अवस्थेत आढळून आल्याने त्याने वरिष्ठांना माहिती दिली. विभागीय वन अधिकारी घटनास्थळी स्थळी दाखल झाल्यानंतर या वाघिणीचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले जात होते.
राखीव वन क्षेत्रात नाल्याला लागून असणाऱ्या एका गुहेत ही वाघीण वास्तव्यास होती.या गुहेचे प्रवेशद्वार हे आकाराने लहान असल्याने काही अज्ञात व्यक्तींनी वाघिणीला गुहेत कोंडून प्रवेश द्वाराजवळ बांबू व काठ्या लावून तिच्या बाहेर येण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण करत आग लावली.
त्यामुळे गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.
पेंच व्याघ्रप्रकल्प,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड,
वणीचे डॉ. अरुण जाधव, झरीचे डॉ. एस.एस. चव्हाण, मुकूटबनचे डॉ. डी.जी. जाधव, मारेगावचे डॉ. व्ही.सी. जागडे यांनी या वाघिणीचे शवविच्छेदन केले असून या अहवालानुसार मृत वाघीण ही गरोदर असून तिच्या पोटात चार बछडे होते व तिचा गुहेला लागलेल्या आगीमुळे गुदमरून मृत्यू झाला असे स्पष्ट करण्यात आले.
वाघ नखांच्या तस्करीसाठी या वाघिणीची निर्घृणपणे हत्या करून तिच्या पायाचे पंजे कापून नेणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात वनविभागाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
वाघांच्या कातडीची व वाघ नखांच्या वाढत्या तस्करीमुळे नाहक वाघांचा बळी जाण्याचे प्रमाण वाढले असून संबंधित घटनेमुळे अभयारण्यातील प्राणी सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आले आहे.