सध्या सचिन वाझे प्रकरण चागलचं गाजत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार नाराज झाल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. याचप्रकरणावरून आता शरद पवार दिल्लीहून तातडीने निघाले आहे. ते संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर आता शरद पवार दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. मुंबईत आल्यानंतर संध्याकाळी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटतील. या भेटीदरम्यान मनसुख हिरेन प्रकरण आणि त्यामधील सचिन वाझे यांचा कथित सहभाग या दोन गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सरकारकडून हे संपूर्ण प्रकरण ज्या ढिसाळपणे हाताळले गेले आहे त्यामुळे शरद पवार प्रचंड व्यथित झाले आहेत. शिवसेनेशी संबंधित असलेल्या सचिन वाझे यांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेनेच्या आग्रहामुळेच सचिन वाझे यांना पोलीस दलाच्या सेवेत पुन्हा सामावून घेण्यात आले होते. मात्र, आता हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणातील आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सभागृहात विरोधकांच्या हल्ल्याला तोंड द्यावे लागत आहे. या सगळ्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेला बसत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदाही सभागृहात फिरकले नाहीत. या सगळ्यामुळे शरद पवार प्रचंड नाराज असल्याचे समजते. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.