मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने हौदोस माजवायला सुरवात केली आहे. त्यात दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढताना दिसत आहे. तसेच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसीचा अल्प प्रमाणात पुरवठा केला जात आहे. लसीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. लसीच्या पुरवठयावरून आता शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
“परदेशातील लोकांना आपलं काही तरी देणं-घेणं लागत म्हणून त्यांना लस द्यायची. मात्र आपल्या देशातील लोकांना मारायचं असा केंद्र सरकाराचा धंदा आहे. राज्यातून रेमडेसिव्हीर निर्यात ताबडतोब थांबवण्याची आवश्यकता होती. ती बऱ्याच दिवसानंतर थांबवली,” असे विनायक राऊत म्हणाले.
पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ऑक्सिजनची मागणी केली. त्याला पंतप्रधानांनी ऑक्सिजन द्यायची तयारी दाखवली माञ ती कुठून ? तर पश्चिम बंगालमधून. म्हणजे बंगाल ते मुंबई हा जर प्रवास बघितला तर कशा पद्धतीने ते ऑक्सिजन देणार आहेत हे तुमच्या सर्वाच्या लक्षात येईल,” असा टोला विनायक राऊतांनी लगावला.