मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी केंद्र सरकारविरोधात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत धक्कदायक आरोप केले होते. या आरोपानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. त्यात आता केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करत असल्याचे विधान आघाडी पक्षाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे खासदारराहुल शेवाळे यांनी केले आहे.
रेमेडिसीव्हर इंजेक्शन बनविणाऱ्या कंपन्यांनी महाराष्ट्राला हे इंजेक्शन विकू नये यासाठी केंद्राने दबाव आणला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. मात्र, शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी मलिक यांचे आरोप हे त्यांचे वैयक्तिक असल्याचे मत मांडले आहे. तसेच आघाडी सरकारची ही भूमिका नाही, असे म्हटले होते. केंद्र आणि महाराष्ट्र सरकार कोरोनाविरुध्द लढण्यासाठी हातात हात घालून काम करत असल्याचे विधान सुद्धा शेवाळे यांनी केले होते.
शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांनी केलेल्या आरोपांबाबत मला काहीही माहिती नाही. उलट केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहे. राज्याकडून केली गेलेली वैद्यकीय मदतीची मागणी केंद्राकडून पुरविली जात आहे. तसेच पुढे माहिती देताना शेवाळे म्हणाले की, नुकतीच आम्ही केंद्रीय राज्य मंत्री मनुसख मांडविय यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे बीआरडी फार्माकडे महाराष्ट्राने केलेली मागणी पूर्ण करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. मांडविय यांनी आपले म्हणणे मान्य केले आहे. त्यामुळे दोन दिवसांत मागणी पूर्ण होणार आहे असं शेवाळे यांनी म्हंटले आहे.