मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात CBI ने गुन्हा नोंद केला आहे. तसेच CBI ने त्यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरी आणि कार्यालयावर सुद्धा छापे मारले आहेत. या छापेमारीमुळे पुन्हा एकदा आघाडी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. या सर्व घटनेवर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
ते म्हणाले की, CBI आपलं काम करत आहेत. CBI चा प्राथमिक अहवाल कोर्टात येईल. तेव्हा काय करायचं ते पाहू, असं विधान संजय राऊत यांनी केले आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले होते . CBIला हायकोर्टाने काही सूचना केल्या आहेत त्यानुसार CBI काम करत असेल असे मला वाटते. यामध्ये राजकीय सुडबद्धीचा प्रकार नसावा, असं मतही यावेळी संजय राऊत यांनी मांडले आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, CBI चा एक अजेंडा आहे. कोर्टाची ऑर्डर आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे CBI च्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नाही. देशमुखांनी त्यांचं म्हणणं CBIकडे मांडले आहे. CBI चा प्राथमिक रिपोर्ट कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचं ते पाहू, असं राऊत म्हणाले. CBI त्यांचं काम करत आहे. कोर्टाने आपलं काम केलं आहे. महाविकास आघाडी सरकारही आपलं काम करत आहे, असंही त्यांनी सांगितले आहे.