सोलापूर। सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अठरा तासात २५ किलोमीटर रस्ता पूर्ण करत रस्ते निर्मीतीचा रेकॉर्ड ब्रेक केला होता. मात्र, दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या टेंभुर्णी गावातून जाणाऱ्या सोलापूर-पुणे महामार्गाचे काम तब्बल पाच वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामुळे संतापलेल्या टेंभुर्णीवासीयांनी चक्क राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन गांधीगिरी पद्धतीने आपला निषेध व्यक्त
केला.
विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कार्यालयात उपस्थित नसल्याने टेंभुर्णीतील शिवसेना, रयतक्रांती तसेच स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीला फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला आहे. २६ मार्च २०१६ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या तब्बल २५ ते ३० हजार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.
त्यावेळच्या कार्यक्रम पत्रिकेत टेंभुर्णीतील रस्त्याच्या चौपदरीकामाचा देखील समावेश होता. मात्र, मागील पाच वर्षात या रस्त्यावरील एकही दगड हालवलेला नसल्याने टेंभुर्णी वासीयांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.या रस्त्यासाठी तब्बल १०१ कोटी रूपयांची तरतूद देखील करण्यात आली होती. मात्र, अद्यापही काम पूर्ण न झाल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी आज अखेर आपला संताप व्यक्त करत गांधीगिरी पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला.
दरम्यान प्रकल्प संचालकांना याबाबत विचारले असता त्यांनी कामासाठी दिरंगाई झाल्याचे कबूल केले. मात्र, लवकरच हा काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.