उत्तर प्रदेश । उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. भाजपा खासदाराच्या मुलावर गोळीबार करण्यात आला आहे. भाजपा खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुष किशोर याच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मात्र पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती मिळत आहे.
आयुषची पत्नी आणि मेव्हण्यावर संशय असल्याने पोलिसांनी आदर्शला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं. या प्रकरणात आयुषच्या पत्नीचीही चौकशी होणार आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आयुषच्या मेव्हण्याला या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे याबाबत कसून चौकशी केली असता, आयुषने स्वत:च आपल्यावर गोळीबार करवून घेतला होता. या गोळीबाराच्या प्रकरणात पाच-सहा जणांना अडकवण्यासाठी त्यानं हा कट रचल्याची माहिती दिली आहे.
आदर्श असं मेव्हण्याचं नाव असून त्याने गोळीबार केल्याचं कबूल केले आहे. तसेच काही लोकांची नावं देखील सांगितली आहेत. आयुषने पाच-सहा लोकांना अडकवण्यासाठी हा कट रचला होता. चंदन गुप्ता, मनिष जयस्वाल आणि प्रदीप कुमार सिंह यांच्यासोबत आणखी दोन जण होते परंतु, त्यांची नावं मला माहीत नाहीत.
आयुषच्या सांगण्यावरून मी फक्त समोरून गोळी झाडली होती. अशी माहिती आदर्शने दिली आहे. मोहनलालगंजचे भाजपा खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुषने प्रेमविवाह केल्यानंतर आपण त्याच्याशी सगळे संबंध तोडले होते. त्याने आपल्याला आत्महत्येची धमकी दिली होती असं म्हटले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आयुषला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.