बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेळके यांना अधिकृत उमेदवार झाहीर केल्यानंतर आता प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे असेच स्थानिक राजकीय जाणकार सांगत आहे.
शुभम शेळके हे युवा पिढीचे प्रतिनिधी आहेत. युवकांना एकत्रित करून राष्ट्रीय पक्षात जाणारी तरुण पिढी त्यांनी समितीकडे आणि सीमाप्रश्नाकडे वळविली आहे. मराठी म्हणून जगताना स्वाभिमान बाळगा, कन्नडच्या विरोधात नाही; पण मराठी असल्याचा अभिमान ठेवा, हे विचार तरुणांमध्ये रुजविण्यात शुभम शेळके यशस्वी ठरले.
शुभम शेळके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता त्यांच्या प्रचाराची धुरा युवकांनीच हाती घेतली आहे. यामुळे मराठी म्हणून जो कोणी या मतदारसंघात आहे, त्याचे मत शुभम यांना पडावे, हे एकमेव ध्येय आता युवकांनी आपल्या मनात बाळगला आहे.
शुक्रवारी रात्री सर्वांत आधी शिवसेनेने शुभम शेळके यांना पाठिंबा दिला. त्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने शेळके यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. नाव अधिकृत जाहीर होताच युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम पीरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत आशीर्वाद घेतला.