१०५ हुतात्म्यांच्या बलिदानांतून महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश घेऊन माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले. हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. १ मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. व या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मे दिन म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे.
कामगार दिनाचा इतिहास
१७ व्या शतकाच्या मध्यापासून सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीने युरोपमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती, पण त्याच बरोबर नवीन समस्या पण निर्माण झाल्या होत्या. त्यातलीच एक समस्या होती कामगारांची. औद्योगिक क्रांतीपासून कामगारांच्या शोषणाला, पिळवणूकीला सुरुवात झाली. त्यावेळी कामाचे तास हे तब्बल १५ तास होते. कामगारांचं जीवन हलाखीचं होतं, त्यांना त्यांच्या मेहनतीच्या मोबदल्यात योग्य तो पगार मिळत नसे. कामगारांच्या अशा परिस्थितीतूनच पुढे जगाचा इतिहास बदलला.
१९८९ मध्ये मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेसने एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचा ठराव मंजूर केला. त्यात त्यांनी कामगारांना दिवसातील ८ तासांपेक्षा जास्त काम न करण्याची मागणी केली. त्यानंतर, हा वार्षिक कार्यक्रम झाला आणि १ मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली.
पुढे चळवळीलाही ‘eight -hour day ‘ या नावाने ओळखलं जाऊ लागलं. अशी पहिली मोठी चळवळ उभी राहिली ऑस्ट्रेलिया मध्ये. २१ एप्रिल १८५६ रोजी दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना त्यांचा हक्क मिळाला. तेव्हापासून ऑस्ट्रेलियामध्ये २१ एप्रिल हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.ऑस्ट्रेलिया मध्ये जे घडलं त्यापासून धडे घेत १ मे १८८६ रोजी अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी कामासाठी ८ तासांची मागणी केली. मागणी पाठोपाठ संप आणि मोठ्याप्रमाणात मोर्चे निघाले. शिकागो मधल्या आंदोलनात पोलिसांमुळे ६ आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने कामगारांच्या मनातला राग आणखीनच वाढला. याचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर बॉम्ब फेकण्यात आले. ७ पोलीस आणि ४ नागरिकांचा यात मृत्यू झाला. याला जबाबदार म्हणून ८ लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा झाली. या फाशीने त्यावेळी जगभर संतापाची लाट उसळली होती. कारण असं म्हणतात की या ८ जणांपैकी एकानेही बॉम्ब फेकला नव्हता.
अशा प्रकारे या रक्तरंजित आंदोलनानंतर १९८० ला १ मे रोजीच कामगारांचं आंदोलन यशस्वी झालं. योग्य पगार, चांगली वागणूक, पगारी सुट्टी आणि ८ तास काम या मागण्या मान्य झाल्या. तेव्हापासून अमेरिकेत हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला मे दिन पण म्हटलं जातं.
भारतात चेन्नईमध्ये 1923मध्ये पहिल्यांदा कामगार दिन साजरा करण्यात आला. ‘लेबर फार्मर्स पार्टी ऑफ इंडिया’ने हा दिवस साजरा केला. कम्युनिस्ट नेते मल्यापुरम सिंगारावेलु चेतियार यांनी सरकारला सांगितले, की कामगारांच्या प्रयत्नांचे, कार्याचे प्रतीक म्हणून हा दिवस ‘राष्ट्रीय सुट्टी’ म्हणून जाहीर करावा.