सध्या संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज वाढत असलेल्या रुग्णसंख्यामुळे आरोग्य यंत्रणांवर मोठया प्रमाणात आर्थिक भार पडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक दानशूर व्यक्ती पुढे येऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सढळ हाताने मदत करताना दिसत आहे.
त्यातच आता मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड १९ मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे.
तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी राज्य सरकारचे हात बळकट करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे. जर तुम्हालाही मदत करायची असेल तर तर खाली दिलेल्या खात्यात आपण सढळ हाताने मदत करू शकता.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते असे मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.