ठाणे – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बध व विकेंड लॉकडाऊन लावण्यात आले. याच विकेंड लॉकडाऊन ठाणे शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शुक्रवार रात्रीपासूनच सर्वत्र शुकशुकाट असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नेहमी गजबजलेली व वर्दळ असणारी ठिकाणे पूर्णपणे शांत झाल्याचे पाहायला मिळाले. ठाण्यातील घोडबंदर रोड, वाघबीळ, माजिवडा, तसेच वर्तनगर, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट या सर्वच ठिकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
त्याचबरोबर भिवंडी भागातही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून, तर नागरिकांनी घराबाहेर न पडता या वीकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद दिला. सर्व भाजीमंडई, बाजारपेठ, फुल बाजारपेठ, हॉटेल्स, व इतर सर्व छोटी मोठी दुकाने बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर पोलिसांकडून रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांची चौकशी करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींकडून ओळखपत्राची खात्री करूनच त्यांना कामाच्या ठिकाणी जाण्याची मुभा देण्यात येत आहे.