मुंबई : कोविड रुग्णांची मुंबई शहर तसेच उपनगरातील वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळावेत यासाठी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी एक पाऊल पुढे टाकीत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘मातोश्री क्रिडा संकुलात’ कोविड सेंटर सुरू करण्यात यावे, अशी सुचना मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. या कामी ट्रस्टतफेॅ उचित ते सहकार्य करण्याची भुमिकाही त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राबरोबर मुंबई शहर तसेच उपनगरात कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने शासकीय, महानगरपालिका तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड मिळणे अशक्य झाले आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढला आहे. राज्य शासन तसेच मुंबई महानगरपालिका रुग्णांना उपचार मिळविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहे.
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार मातोश्री क्रिडा संकुल हे बंद ठेवण्यात आले आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने जास्तीत जास्त रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत यासाठी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, अंधेरी (पूर्व) येथील ‘मातोश्री क्रीडा संकुल’मध्ये तात्पुरत्या स्वरुपात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपुर्ण यंत्रणेसह कोविड सेंटर सुरु करावे, अशी सुचना वायकर यांनी मनपा आयुक्त इ. सि.चहल तसेच अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. रुग्णांची संख्या कमी होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केल्यास अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना निश्चित काही प्रमाणात दिलासा तर मिळेलच त्याचबरोबर अनेक रुग्णांचे जीवही वाचु शकतील, असे ही वायकर यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे.