संपूर्ण देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे, त्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ज्या प्रमाणे रुग्णसंख्या वाढतेय त्याचप्रमाणे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच देशात ऑक्सिजनचा तुटवडा मोठया प्रमाणात जाणवत आहे, त्यामुळे संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या मुद्द्यावरून आता दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावलं आहे.
दिल्ली हायकोर्टाने सांगितले की, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणे ही केंद्राची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत सरकार एवढे बेफिकीर कसे काय असू शकते. कुणाच्यातरी हातापाया पडा, उधार उसनवारी करा, चोरी करा, पण रुग्णालयांसाठी ऑक्सिजन घेऊन या. आम्ही रुग्णांना मरताना पाहू शकत नाही, अशा परखड शब्दात हायकोर्टाने केंद्र सरकारला सुनावले.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रत्येक दिवशी २ लाखांचा टप्पा रुग्ण पार करत आहेत. अशातच दुसरीकडे ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागला आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी नाशिकमधल्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन लीक झाल्यामुळे २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. यातच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयाने काल दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या मुद्द्यावरून आता दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावलं आहे.