शाळांचे खाजगीकरण आणि नोकऱ्यांचे कंत्राटीकरण थांबवा

एसएफआय - डीवायएफआयचे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन


बीड ( प्रतिनिधी ता. १३) : महाराष्ट्रातील ६२ हजार सरकारी शाळा वेगवेगळ्या संस्थांना दत्तक देऊन त्यांचे खाजगीकरण थांबवा आणि खाजगी कंपन्यांद्वारे नोकरभरती करण्याचा निर्णय रद्द करा. या मागणीसाठी आज १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि डेमोक्रॅटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या विद्यार्थी – युवा संघटनेने आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसरातील लोकांचे आणि जिल्हा प्रशासनाचे चांगलेच लक्ष वेधले. या आंदोलनात विद्यार्थी आणि युवकांना सोबत घेऊन एसएफआय – डीवायएफआय आक्रमक झाल्याचे दिसून आले.

सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र सरकारने नुकतेच दोन निर्णय घेतले आहेत. त्यात महाराष्ट्र राज्यातील सरकारी शाळा राज्यातील वेगवेगळ्या संस्थांना दत्तक देणे व येणाऱ्या काळात नोकरभरती ही कंत्राटी पद्धतीने बाह्ययंत्रणेद्वारे भरण्याचा निर्णय घेतला गेला. हे दोन्ही निर्णय जनविरोधी असून एसएफआय – डीवायएफआय या निर्णयाचा तीव्र निषेध करते.

सरकारी शाळांचे खाजगीकरण करून सरकार आपल्या शिक्षण देण्याच्या मुख्य जबाबदारीतून पळ काढत आहे. हा निर्णय राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण नाकारणारा आहे. यामुळे शिक्षण खाजगी क्षेत्राला देऊन त्यात व्यापार सुरु होईल. शिक्षण अधिकच महाग बनेल आणि शिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना नाकारली जाईल. हा अत्यंत धोकादायक निर्णय आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने ९ खाजगी कंपन्याद्वारे राज्यातील विविध विभागातील रिक्त पदे भरण्याचा शासन निर्णय काढला. या निर्णयामुळे सरकारी नोकरी कंत्राटी बनेल. कंत्राटीकरणामुळे नोकरीची कसलीच सुरक्षितता राहणार नाही. उच्च शिक्षित तरुणांवर वेठबिगारी ओढवली जाईल. आणि त्यास सरकार जबाबदार राहील. कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देणे ही सरकारचे महत्त्वपूर्ण काम असून त्यापासून सुद्धा सरकार दूर जात आहे.

म्हणून सरकारने राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांच्या हिताचा विचार करून शाळांचे खाजगीकरण आणि नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याचे शासन निर्णय त्वरित रद्द करावे. अशी मागणी एसएफआय – डीवायएफआयने केली आहे.

या आंदोलनात एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के, जिल्हा अध्यक्ष लहु खारगे, जिल्हा सचिव संतोष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश कोकाटे, डीवायएफआयचे तालुका अध्यक्ष सुहास जायभाये, जिल्हा उपाध्यक्ष विनायक चव्हाण, किरण ढोले, शिवा चव्हाण, विष्णू गवळी, अक्षय वाघमारे, पवन चिंचाणे, अमोल सानप, आकाश कचरे, अशोक नागरगोजे, रमेश नाईकवाडे, संकल्प साठे, ऋषी कोकाटे, दत्ता सोलनकर, कृष्णा जगताप, ओम काळे, अनंत चव्हाण, निखिल पुंडगे, सुनील आडे, युवराज राठोड, सतीश राठोड, निखिल मिरपगार, रणवीर ठाकूर, राजेंद्र लाड आदीसह विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *