पुणे दि. 11- आज MPSC कडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या करोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं या परिपत्रकावर नमूद करण्यात आलं होत. १४ मार्चला परीक्षा होणार होत्या परंतु अवघ्या ३ दिवसांच्या तोंडावर आलेली परीक्षा रद्द केल्याने परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पाहायला मिळू लागला आहे.
एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे. सुरुवातीला अलका चौकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला होता. पण पोलिसांनी एका बाजूची वाहतूक सुरू केली असली, तरी दुसऱ्या बाजूला विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा होऊन एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो.
करोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ?
ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे.— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 11, 2021
“इतर सर्व परीक्षा होत असताना फक्त एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणं हे चूक आहे. सरकारने तातडीने हा निर्णय बदलायला हवा. परीक्षेच्या ३ दिवस आधी परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत”, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.
MPSC च्या परीक्षांसाठी विद्यार्थी हे पुण्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले असल्याने आपापल्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहण्यासाठी पोहोचले होते. मात्र, आता ऐन वेळी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निवडणुका, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि इतर सर्व व्यवहार जर सुरळीत होऊ शकत असतील, तर परीक्षा का होऊ शकत नाहीत? असा सवाल आता विद्यार्थी उपस्थित करू लागले आहेत.