अमरावती। राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण हे वाढत चालले आहे. कोणी आयुष्याला कंटाळून तर कोणी टेन्शनमध्ये आत्महत्या करताना दिसत आहे. अशातच अमरावतील एका कन्येने आपला जीव गमावला आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण या २८ वर्षीय तरूण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी पत्र लिहलं, त्या पत्रात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय.
मूळच्या सातारच्या असणाऱ्या दिपाली चव्हाण यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र वन सेवा 2014 परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. जिथे माणसं कामं करायला घाबरतात तिथे ही तरूण अधिकारी आपली कर्तव्याची अमिट छाप उमटवत होती. त्यांच्या कामाची सर्वत्र चर्चा होती. रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडले होते. त्यातून त्यांची ओळख “लेडी सिंघम” अशी झाली होती.
आत्महत्या करण्यापूर्वी पत्रातील आरोप
वेळेवर सुट्टी दिली जात नव्हती. पगार रोखून धरला जात होता. मध्यरात्री भेटायला बोलवायचे. मनाप्रमाणे केलं नाही तर निलंबित करण्याची धमकी देतात. गर्भवती असतानाही ३ दिवसांच्या ट्रेकवर पाठवलं. ट्रेकमुळे माझा गर्भपात झाला इ. अनेक आरोप पत्रात नमूद आहेत.
दरम्यान पत्रात दीपालीने ज्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवला ते उपवनसंरक्षक शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावर आज अटक करण्यात आली. तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी नॉट रीचेबल आहेत.