दरवर्षीप्रमाणे कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. हवामानातील बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उदभवतात. उन्हाची तीव्रता वाढल्याने प्रामुख्याने त्वचाविकार, उलट्या, उष्माघात, अॅसिडिटी, डोळे तापणे, थकणे, चक्कर येणे, थकवा येणे हे आजार संभवतात.
’उन्हाळ्याच्या दिवसांत पचनशक्ती थोडीशी मंद झालेली असल्यामुळे भूक कमी होते. खाण्यात काही अबरचबर आले की पोट बिघडते. पोट बिघडले की लघवीच्या तक्रारीही वाढतात. आतडय़ात ई- कोलाय नावाचे जीवाणू असतात. पोट बिघडते तेव्हा हे जीवाणू उपद्रवी बनतात. या जीवाणूंनी उत्सर्जित केलेल्या विषारी द्रव्यांचा मूत्रसंस्थेवरही परिणाम होतो. मूत्रमार्गाला सूज आलेली असली तर त्या ठिकाणी जीवाणूंना वाढण्याची संधीच मिळते आणि मूत्रमार्गाच्या संसर्गासाठीही ते कारणीभूत ठरतात.
प्रतिबंधासाठी-
* पुरेसे पाणी पिणे अर्थातच गरजेचे. काहींना घाम अधिक येतो तर काहींना कमी. पण सर्वसाधारणपणे चोवीस तासांत शरीरात तयार होणाऱ्या मूत्राचे प्रमाण कमीत कमी दोन ते अडीच लिटर असावे या हिशेबाने द्रवपदार्थ घ्यावेत.
* माठातले वाळ्याचे पाणी प्यायले तरी चांगले.
* शहाळ्याचे पाणी उत्तम
* नीरा देखील लघवी वाढवणारी असते परंतु ती शुद्ध असावी.
* कलिंगडाचा रस
डॉक्टरांकडे केव्हा जावे–
लघवीला होणारा त्रास अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवलेले चांगले. उन्हाळी लागल्यावर काहींना लघवीतून रक्त जाण्यासारखे लक्षण दिसत असले तरी लघवीतून रक्त जाण्याची इतर कारणेही असू शकतात. त्रास नेमका कशामुळे होतो आहे याबद्दलची शंका दूर करण्यासाठी डॉक्टरांकडे जावे. मूत्रमार्गाचा संसर्ग असल्यास त्यावर वेळीच उपचार होऊ शकतील.