राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याचे केंद्रीय पथकाने अहवालात स्पष्ट केले. देशातील सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत असून चाचण्यांची संख्या वाढविणे, रुग्णशोध मोहिमेस गती देणे आणि रुग्णालये, करोना केंद्रे सुविधासज्ज ठेवण्याच्या सूचना केंद्राने राज्याला दिल्या आहेत.
केंद्रीय पथकाच्या अहवालानुसार राज्यात ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये करोना नियमांचे योग्य पद्धतीने पालन होत नसल्याचा ठपका केंद्रीय पथकाने आपल्या अहवालात ठेवला आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवले आहे. रात्रीची संचारबंदी, सप्ताहाअखेरीस टाळेबंदी आदी उपाययोजनांचा करोना नियंत्रणात मर्यादित परिणाम होत असून, कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचण्यावाढीवर भर देण्याची सूचना राजेश भूषण यांनी या पत्राद्वारे राज्याला केली आहे. सद्य:स्थितीत आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा पुरेशा असल्या तरी कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी नियोजन करावे, असेही या पत्रात म्हटले आहे.