मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यातच कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र घोषणा करण्यापूर्वी नागरिकांना थोडा वेळ द्यावा अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी केली आहे.
लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वी सामान्य नागरिक यामध्ये भरडला जाऊ नये तसेच ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी लॉकडाऊन घोषित करण्याआधी जनतेला ३ दिवसांचा वेळ द्यावा, अशी विनंती पत्राद्वारे शिवसेना नेत्या निलम गो-हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी 3 दिवसांचा वेळ जनतेला द्यावा. जेणेकरून गरजेच्या वस्तू घेण्यासाठी लोकांची गर्दी उसळणार नाही आणि लॉकडाऊनचा उद्देश सफल होईल. तसेच बाराबलुतेदार, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने काहीतरी सोय करावी. तीन दिवसांमध्ये ज्यांना त्यांच्या घरी जायचे आहे त्यांची जाण्याची व्यवस्था करावी. त्यांना सूट द्यावी, अशी मागणी नीलम गो-हे यांनी केली आहे.
#कोविड१९ १ /
लाॅकडाऊन प्रत्यक्ष होण्याआधी तीन वर्किंग दिवस अवसर मिळावा.धान्य व दरडोई आर्थिक मदत मिळावी .आॅक्सीजन पुरवठ्यासाठी प्रकल्प ऊभारण्यास आर्थिक तरतूद करायचा राज्यसरकारचा विचार स्वागतार्ह @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat यांना निवेदन
सोबत प्रत @MahaDGIPR pic.twitter.com/XlhmfvfWtm— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) April 11, 2021