मुंबई – संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. नागपुरातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येसोबतच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला सर्वात जास्त कोरोना रुग्णांचे मृत्यू हे नागपूर जिल्ह्यात होत आहेत. गेल्या ३ दिवसांपासून नागपुरात दररोज कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा ५० वर आहे. ३ दिवसांत नागपूरमध्ये १६७ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. एकीककडे नव्या रुग्णांची संख्या ही सातत्याने ३ हजाराच्या घरात आहे, तर मृत्यूचे प्रमाणही ५०च्या घरात आहे.
नागपूरपाठोपाठ पुण्यातही परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. एकीकडे नागपुरात ५०च्या जवळ दररोज कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत, तर तेच पुण्यात ३०च्या आसपास कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण आहे. पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट २२ टक्क्यांवर गेला आहे, तर मृत्यूदर २ टक्क्यावर आला आहे.