मुंबई : सचिन वाझे प्रकरण आणि IPS अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी पोलिसांचे नाव कुठेतरी खराब झाल्याचे आढळून आले होते. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले आहे चित्रपटात दाखवतात ते पोलीस आणि प्रत्यक्षातले पोलीस यांच्यात जमिन आस्मानाचा फरक असतो, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मंगळवारी नाशिकच्या पोलीस प्रबोधिनीत ११८ वा दिशांत सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रशिक्षण पुर्ण केलेल्या भावी अधिकाऱ्यांना संबोधित केले होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,चित्रपटात दाखवतात ते पोलीस आणि प्रत्यक्षातले पोलीस यांच्यात जमिन आस्मानाचा फरक असतो. प्रत्यक्षात पोलिसांना जमिनीवर राहून काम करावं लागतं. पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो. त्यामुळं प्रसंगावधान बाळगणं महत्वाचं असतं, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
तेरा महिने प्रशिक्षणातून तुम्ही सुदृढ शरीर कमावलेलं आहे. सेवा करताना पोलिसांना नेहमी नव्या भुमिका घ्याव्या लागतात. त्यामुळे सेवेसाठी निरोगी आणि निकोप मन देखील आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री म्हणालेत. खडतर प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर जल्लोष तर होणारच पण बेहोश होऊन चालणार नाही. तुमच्या परिवारासोबत आता महाराष्ट्राची जबाबदारी देखील तुमच्यावर आहे, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.